कर्जत (योगेश गांगर्डे) : - उत्तरेचे प्रेम बाजूला ठेऊन खा विखे यांनी दक्षिणेत कमी झालेला गोडवा वाढविण्यासाठी साखर वाटपेचा निर्णय घेतला मात्र ही साखर वाटप काही गोड होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या साखर वाटपात साखर न मिळाल्याने साखरेचा ट्रक अडवल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात घडला. त्यामुळे विखेंच्या गोड साखरेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सध्या तालुक्यातील गावोगाव साखर वाटपाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत, कोणत्या गावात साखर वाटली जाणार याची माहिती देणारे फलक लागणाऱ्या कागदपत्रांसह खा विखेंचे कार्यकर्ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. गावात साखर वाटपाचा वेळ दिला जातो, तालुक्यातील एका गावात साखर वाटप करून वेळ संपल्याचे कारण देत साखर वाटप बंद करून गाडीसह परतीचा रस्ता धरला, मात्र अनेक नागरिकांना साखर न मिळाल्याने तेथील काही युवकांनी साखरेचा ट्रकच अडवून धरला, गावातील महिला झेरॉक्स काढत आहेत, लोक थांबले आहेत , त्यांना जोपर्यंत साखर दिली जात नाही तोपर्यंत गाडी हलू देणार नाहीत, विखेंना बोलवा नाहीतर कोणाला बोलवा, साखर वाटप झाल्याशिवाय गाडी हलणार नाही असा पवित्रा येथील युवकांनी घेतल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दिलेल्या वेळेआधीच साखर वाटप बंद करून लोकांची व महिलांची धावपळ केल्याची तक्रार येथील युवकांनी केली, तसेच वाटप केलेली साखर घेऊन जा नाहीतर गाडीच्या मागे पळत असलेल्या लोकांना साखर वाटप करा त्याशिवाय गाडी जाऊ देणार नसल्याचे युवकांनी सांगितले.
खा विखेंकडून घरोघरी साखर पेरणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली, त्यासाठी विखेंची यंत्रणा देखील कामाला लागली आहे, मात्र या साखर पेरणीला आता विरोध होताना दिसून येत आहे, तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तालुक्यातील अनेकांना साखर न मिळाल्याने विखेंची गोड साखर चर्चेचा विषय बनली आहे.


