कर्जत (प्रतिनिधी)  : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी कर्जत तालुक्यातील कोंभळी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओम चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट कोंभळी च्या वतीने रंगपंचमीच्या यात्रेसाठी बुधवारी मानाची काठी घेऊन दिंडीचे मढीकडे मोठ्या उत्साही वातावरणात प्रस्थान झाले.


 अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या पदयात्रेसाठी जय्यत तयारी ओम चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट कोंभळी यांच्या वतीने करण्यात आली होती. ओम चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष गुरुवर्य हभप सुदाम गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे व उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.


 लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कानिफनाथ महाराज यांचा यात्रोत्सव श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी भरतो. या यात्रोत्सवासाठी दरवर्षी येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. रंगपंचमीला भरणाऱ्या यात्रेसाठी कोंभळी येथून शेकडो नाथभक्त पायी दिंंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे जातात. 


 बुधवारी (दि. २७) सकाळी ६ वाजता कानिफनाथ समाधी मंदिर कोंभळी येथे समाधी अभिषेकाने या सोहळ्यास सुरुवात होणार आहे, त्यानंतर श्री कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूकीद्वारे गाव प्रदक्षिणा होऊन मढीकडे प्रस्थान होणार आहे. पहिला मुक्काम श्री शिवाईमंदिर पुंडी (ता आष्टी) येथे असणार आहे, याठिकाणी हभप देवकाते महाराज पाटेवाडी यांचे हरिकीर्तन होणार आहे, गुरुवारी (दि. २८ ) रोजी दुसरा मुक्काम सुलेमानदेवळा (ता आष्टी) येथे असून याठिकाणी हभप शरद महाराज गांगर्डे यांचे हरिकीर्तन होणार आहे. शुक्रवारी (दि. २९) रोजी मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगाव येथे मुक्काम असणार असून हभप अविनाश महाराज साळुंके यांचे हरिकीर्तन याठिकाणी होणार आहे, शनिवारी (दि. ३०) रोजी मायंबागड येथे मिरवणूक आणि महाल प्रदक्षिणा होऊन चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट कोंभळी मठ मढी येथे मुक्काम होणार आहे , रविवारी (दि. ३१ ) मढी येथे महाल प्रदक्षिणा मिरवणूक होणार आहे.


भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीक्षेत्र मढी येथील यात्रोत्सव होळी ते गुढीपाडवा असा पंधरा दिवस चालतो. यात्रोत्सवास होळीपासून प्रारंभ होतो. रंगपंचमी व गुढीपाडवा या दोन दिवशी मोठा यात्रोत्सव भरतो. रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या यात्रेला महाराष्ट्रातून लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रोत्सवात कोंभळी येथील काठीला विशेष मान असतो. वाजत गाजत मिरवणुकीने जाऊन काठीला कळसाचे दर्शन घडवून आणले जाते. बुधवारपासून सुरू झालेल्या या दिंडी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातुन शेकडो भाविक भक्तिभावाने सहभागी झाल्याचे पहावयास मिळत आहेत, या दिंडी सोहळ्याचे उत्कृष्ट असे नियोजन ओम चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट कोंभळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांनी करण्याचे आवाहन उद्योजक सुरेश काका गोरखे यांनी केले आहे.