कर्जत (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिल्ह्यात द्वितीय तर  कर्जत तालुक्यातून प्रथम आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत '' मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा'  हे अभियान महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आले. यामध्ये कर्जत तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन स्वतंत्र गटातून शाळांचे केंद्रस्तरीय परीक्षण समिती व तालुकास्तरीय परीक्षण समितीच्या माध्यमातून परीक्षण करण्यात आले.

 45 दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून आकर्षक वर्ग सजावट, शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण केले. विद्यालयात प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले असून यासाठी मोबाईल ॲपच्या मदतीने प्रत्यक्ष E.V.M मशीन तयार करून त्याद्वारे अभिनव अशी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली. विद्यार्थ्यांसाठी शाळेत समर्थ बचत बँकेची स्थापना करण्यात आली असून या बँकेचे सर्व व्यवहार विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच पाहतात. विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार कळावेत यासाठी युनियन बँकेच्या कर्जत शाखेत विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. शाखाधिकारी श्री लोंढे साहेब यांनी विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाची माहिती दिली.

 विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी महावाचन चळवळ तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा बरोबरच कुस्ती, कबड्डी, लंगडी, लंगूरच्या यासारख्या देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले होते.

 राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्यासाठी मेरी माटी मेरा देश व गुजरात राज्याची ओळख करून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहिती व्हावी यासाठी विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य शिबिर तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापना विषयी डॉक्टर विद्या काकडे यांचे तर लहान वयात होणारा मधुमेह, लठ्ठपणा व डोळ्यांचे विकार याविषयी डॉक्टर चंद्रशेखर मुळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. 

विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने स्टेट बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र जाधव तसेच विद्यार्थ्यांमधील विविध कौशल्यांचा विकास व्हावा व त्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व समजावे यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री मुळे सर व बेलेकर मॅडम यांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना याविषयी माहिती देण्यात आली.

 समर्थ विद्यालयातून शिकून गेलेल्या व सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी करिअर करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने विद्यालयात अनेक भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

 मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जाहीर झाल्यानंतर विद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य चंद्रकांत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संपतराव बावडकर सर व श्री मधुकर बरबडे सर यांच्या नियोजनाखाली शिक्षकांच्या  व विद्यार्थ्यांच्या विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यासारख्या स्वयंसेवी संघटना यांच्या माध्यमातून शाळेचा गुणात्मक दर्जा वाढवताना शाळेचे अंतरबाह्य सौंदर्यीकरण करण्यात आले.

 या अभियानासाठी समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव राऊत, संस्थेचे सचिव वैभव छाजेड व संस्थेच्या निरीक्षिका सौ. उषा अक्षय राऊत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्रकुमार नेवसे यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

 समर्थ विद्यालय हे आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबद्दल शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत कर्जत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल समर्थ विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यांचे संस्था अध्यक्ष श्री. नामदेवराव राऊत,सचिव श्री .वैभव छाजेड, संस्था निरीक्षिका सौ. उषा राऊत, गटविकास अधिकारी प्रमोद शेंडगे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती उज्वला गायकवाड, विस्तार अधिकारी श्री.देवराम लगड, श्री.चौधरी, केंद्रप्रमुख श्री. लबडे या सर्वांनी अभिनंदन केले.

समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने अतिशय अल्प कालावधीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे विद्यालय म्हणून ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत कर्जत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून देण्यात विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालकांचे एकत्रित प्रयत्न असून, यापुढेही विद्यालय आपला नावलौकिक असाच वाढवत राहील. शिस्त ,संस्कार व गुणवत्ता यावर आधारित शिक्षण देतानाच एक उत्तम नागरिक घडविण्याचे काम विद्यालय करत आहे. विद्यालयाच्या प्रगतीत समाज प्रबोधन संस्था, माजी विद्यार्थी, पालक व विविध सामाजिक संस्थांचा खूप मोलाचा वाटा आहे.

-  चंद्रकांत राऊत, प्राचार्य