कर्जत (प्रतिनिधी) : माझ्याबरोबर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम हे करत आहेत, माझ्या छातीवर मी कितीही वार सहन करू शकतो, पण कार्यकर्त्यांवर केलेले वार सहन करणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी खा सुजय विखे यांचे नाव न घेता दिला. 

ते कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील स्वाभिमान जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज (दि. १० रोजी) लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचे कार्यक्रम तालुक्यातील चापडगाव , माही जळगाव, कोंभळी, निमगाव गांगर्डा, मिरजगाव, कोरेगाव याठिकाणी पार पडले.

यावेळी पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की, खा विखे हे निवडून गेल्यानंतर पाच वर्षात मतदारसंघात आलेच नाहीत, शेवटी ते साखर घेऊन मतदारसंघात आले, कारण लोक त्यांना येऊ देणार नाहीत म्हणून त्यांनी साखर वाटून वाट निर्माण केली, डाळ आणि साखर वाटप करणे हे आमदार खासदारांचे काम नाही, त्याचे काम मतदारांचे प्रश्न मार्गी लावणे आहे, आपले खासदार अमित शहा यांना भेटायला गेले आणि निर्यातबंदी उठवली असे सांगितले, मात्र सचिवाने सांगितले की निर्यातबंदी उठली नाही, असा खोटारडेपणा खासदार विखे करत आहे.

आमच्या कुटुंबाने जिल्ह्यावर राज्य केले असे हे सांगतात, मात्र यांनी जिल्ह्यात कोणते मोठे काम आणले हे दाखवून द्यावे. प्रत्येक तालुक्यात त्यांचे हलगिवाले आहेत, ते निवडणूक आली की भुछत्रासारखे बाहेर येतात , हे हलगिवाले कधी कोणाच्या मयतीला नाहीत, दहाव्याला नाहीत. आपली एक खासियत आहे निलेश लंके जे बोलतो ते करतोच, हे दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करतात, दुसऱ्यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचा गुपचूप नारळ फोडतात अशी टीका लंके यांनी विखे यांच्यावर केली. 

 केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजपने महाराष्ट्रात अस्थिर परिस्थिती निर्माण केली, शेतकरी हिताचे निर्णय या सरकारने घेतलेले नाहीत असे निलेश लंके म्हणाले.

यावेळी बाळासाहेब साळुंके, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव तनपुरे, किशोर तापकीर, महेश काळे, विशाल मेहेत्रे, नितीन धांडे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष पूजा सूर्यवंशी, उद्योजक काका गोरखे, सचिन दरेकर, सतीश लाघुडे, डॉ सुनिल मुळे, चेअरमन मारुती गांगर्डे, विठ्ठल गांगर्डे, हरिश्चंद्र जगताप, केशव अडसूळ, प्रतिक काकडे, रुपचंद गांगर्डे, अनिल शिंदे, रविंद्र महारणवर, दीपक यादव, सचिन मांडगे, दादा काळदाते, गणेश सुद्रीक, सरपंच अनुराधा काकडे, उपसरपंच पूजा भंडारी, स्वाती काकडे, संदीप गावडे, गणेश गायकवाड, दीपक मांडगे, सुधीर यादव आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ रोहित पवार म्हणाले, लोकसभेमध्ये आपल्या विचारांचा, एक तुमच्यातला सर्वसामान्य व्यक्ती लोकसभेत पाठवायचा आहे, मतपेट्या मधून जेव्हा मतदान बाहेर निघेल तेव्हा निलेश लंकेच निवडून येतील. कोरोना काळात आपण सेवा देत असताना विरोधक पडले होते त्यामुळे ते घरीच होते, सुजय विखे हे देखील त्याकाळात दिसले नाहीत, त्यावेळी त्यांचा विमानातील फोटो पहावयास मिळाला, पण रेमडीसीविर लोकांना मिळाले नाहीत, अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना लोकांना मिळवून दिल्या, रुग्णालयांना निधी आणला, वनविभागाच्या परवानगी अभावी बंद पडलेली विकास कामे चालू केली, जवळपास सर्व गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर केल्या. पाणी टंचाई मुळे पाण्याचे टँकर चालू केले होते ते काही लोकांनीं बंद केले होते, ते आपण पुन्हा सुरू करून गावातील सर्वांना पाण्याची सोय केली आहे, यामध्ये कोणताही दुजाभाव केला जात नाही.

पवार पुढे बोलताना म्हणाले की, एमआयडीसी बाबत मी सुरुवातीपासून पाठपुरावा करत आहे, प्रथम जामखेडला सर्व्हे केला मात्र त्याठिकाणी मुबलक जागा नव्हती, त्यामुळे पाटेगाव ला जागा मिळाली, मला माहित सुद्धा नव्हते पाटेगावला जमीन मिळाली आहे, कोंभळी येथील एमआयडीसी ला जे गट घेतले आहेत ते वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने त्याठिकाणी एमआयडीसी होऊ शकत नाही, फॉरेस्ट असल्याने मोठ्या कंपन्या येऊ शकत नाहीत. आमच्या उद्योग व्यवसायात ओळखी असल्यामुळे एमआयडीसी फक्त पवारच चालवू शकतात. माणिकडोह बोगदा तयार करून कर्जत सह सीना परिसरातील गावांना पाणी देण्याचे नियोजन आहे, तुकाई उपसा सिंचन योजनेला कमी पाणी आरक्षित कमी असल्याने शेतीला पाणी देता येणार नाही. 

यावेळी गुलाबराव तनपुरे, महेश काळे,  पूजा सूर्यवंशी, किशोर तापकीर, सुरेश गोरखे, रुपचंद गांगर्डे, कोंताबाई सूर्यवंशी, उद्धव गांगर्डे यांनी भाषण केले. सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष ऍड रावसाहेब गांगर्डे यांनी केले, जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पै सचिन दरेकर यांनी केले. आभार सतीश लाघुडे यांनी मानले.


कोंभळी येथील शेतकरी रुपचंद गांगर्डे यांनी कांदा विकून आलेली रक्कम निलेश लंके यांना भेट दिली. दरम्यान कोंभळी येथील युवक ज्ञानेश्वर गांगर्डे याने निलेश लंके यांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निवेदन दिले, लंके यांनी मी मराठा आरक्षणाबाबत उपोषण केले आहे, विधानभवनाला कुलूप लावल्याचे लंके यांनी सांगितले. मात्र भाषणात बोलताना मराठा आरक्षणाबाबत बोलणे टाळले.