कर्जत (प्रतिनिधी) : सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व खुळचट रुढी - परंपरा यांना फाटा देत नुकताच एक आगळा वेगळा " शिव विवाह" शिवधर्म पद्धतीने तालुक्यातील मिरजगाव येथील पाटील लॉन्स येथे मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पडला.

 तालुक्यातील कोंभळी येथील शिवश्री डॉ ज्ञानेश्वर गांगर्डे यांचे चिरंजीव कृष्णा व तालुक्यातील कोकणगाव येथील भैरवनाथ बोरुडे यांची कन्या स्वप्नालि यांचा हा विवाह आदर्श विवाह ठरला असुन जिल्हाभर या विवाहाच्या कौतुकाची चर्चा लोकांमध्ये व ऐकायला व पहायला मिळाली.

 संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले. जगाचा पोषणकर्ता बळीराजाचे पूजन करून शिवधर्माचे शिव पंचके" म्हंटली गेली. 

या विवाहात अक्षदारूपी धान्य वाया न घालता त्या ऐवजी फुलांचा वर्षाव नव दांपत्यावर करण्यात आला. या विवाहाने समाजात एक नवा आदर्श आणि नवा पायंडा घातला एवढे मात्र निश्चीत.

शिवविवाह संकल्पना काय आहे?

शिवविवाह हा एक निरोगी, बुद्धिमान, कर्तृत्ववान, सर्जनशील दाम्पत्य संस्कारित करण्याचा विधी आहे. निर्मळ निरामय सहजीवनाच्या मार्गावरून चालणारे दाम्पत्य निकोप कुटुंबव्यवस्थेचे बीज आहे. अशी प्रज्ञावान कर्तृत्ववान, शीलवान कुटुंबे एकत्र आल्यास प्रतिभासपन्न समाजाची निर्मिती होते. समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, मानवता, विश्वबंधुत्व, आधुनिकतेसोबतच आपल्या उज्ज्वल संस्कृतीचा समन्वय, वैज्ञानिक दृष्टिकोन व त्याचे आचरण अशा उन्नत मूल्याना वैवाहिक जीवनामध्ये पर्यायाने कुटुंबामध्ये आणि अंतिमतः समाजामध्ये रुजवणे हाच शिवविवाह संस्कार होय.


गेली 30 वर्ष परिवर्तनवादी विचाराशी नाळ असल्याने सर्व सुख दुःख व सण उत्सव शिवविचाराने साजरे करत असल्याने माझ्या मुलाचा शिवविवाह करण्याचा निर्णय घेतला त्यास शिवविवाहास उपस्थित सर्व संमाबांधवांनी शिवविवाहाचे निर्णयाचे कौतुक केले व अभिनंदन करून अनुकरणीय असल्याचे मान्य केले

    - शिवश्री डॉ ज्ञानेश्वर गांगर्डे