कर्जत (प्रतिनिधी) - हिमालयातील उत्तुंग हिमच्छादित गिरिशिखरे गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देत आलेले आहेत. या दुर्गम गिरिशिखरांवर चढाई करण्यासाठी गिर्यारोहणातील विविध सुरक्षा साधनांचा आणि तंत्राचा वापर करावा लागतो. यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक असते.

अक्षय भापकर यांनी नुकतेच माऊंटेनिअरिंग कोर्स पूर्ण केला. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथील नेहरू पर्वतारोहण संस्थान येथे एक महिना कालावधीचे हे प्रशिक्षण होते. संस्थानचे प्रिन्सिपॉल कर्नल अंशुमन भतुरिया यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. भारतीय सेना दलाच्या अखत्यारीत असलेल्या या प्रशिक्षण संस्थेत देश- विदेशातील गिर्यारोहक प्रशिक्षणासाठी दाखल होत असतात.

या प्रशिक्षणात गिर्यारोहणासाठी आवश्यक सुरक्षा साधने, दोर, त्यांचा तंत्रशुद्ध वापर, रॉक क्लायंविंग, आइस क्लायंबिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग ही आवश्यक तंत्र शिकवली. तसेच दुर्गम गिरिशिखरांवर चढाई करत असताना आवश्यक मॅप रिडिंग व नेविगेशन तंत्रज्ञान, पर्वतांची भौगोलिक रचना, येणारे अडथळे व धोके, या गोष्टीचा ही अभ्यासक्रमात समावेश होता. अति उंचावर असणारी विरळ हवा, अतिथंड व सतत बदलणारे हवामान, अचानक येणारी वादळे, हिमवृष्टी यामुळे गिर्यारोहकांना आरोग्यविषयक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यासाठी आवश्यक पूर्व तयारी, काळजी व प्रथमोपचार यांचे प्रशिक्षण सुध्दा दिले गेले. टेखला कॅम्प येथे पाच दिवसांचे रॉक क्लायंविंग प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १२,३०० फुटांवरील बेस कॅप येथे आइस क्राफ्ट हे प्रशिक्षण पार पडले. या नंतर १४,५०० फुटांवरील अॅडवान्स बेस कॅम्प येथे आइस क्लायविंगचे प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणाच्या वेळी अक्षय भापकर यांनी १५३०० फुट उंचीचे माऊंट हुरा हे शिखर यशस्वीपणे सर केले.

यापूर्वी ही भापकर यांनी माऊंट युनाम या २०,३०० फूट उंचीच्या शिखरावर यशस्वीपणे चढाई केली होती. तसेच सह्याद्री मधील तैल बैल, लिंगाना, वजीर अशा कातळ सुळक्यावर चढाई केली आहे. ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून गिर्यारोहण क्षेत्राची आवड असणाऱ्या नवोदित गिर्यारोहकांन मार्गदर्शन करण्याचा मानस अक्षय भापकर यांनी व्यक्त केला.