कर्जत (प्रतिनिधी) : कोणतीही परीक्षा असो की नोकरी यामध्ये संयमाची निराळी परीक्षा असते. आपल्याला इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे दिपक दादा सकट.
तालुक्यातील थेरगाव येथील आनंदवाडी मधील दीपक सकट प्रामाणिक कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालयीन लिपिक पदाला गवसणी घातली आहे.
दिपक सकट याचं बालपण गावातल्याच वस्तीवर गेलं. दिपक चे गाव अहमदनगर मधील कर्जत तालुक्यातील थेरगाव आहे, दिपक चे वडील शेतकरी असून घरी आई, दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे. घरची परिस्थिती हलाखीची होती. मात्र आपल्या मुलांना खूप शिकवायचं दादा सकट यांची मोठी इच्छा होती. वडिलांप्रमाणे मुलांना देखील शिक्षणात रस होता. त्यामुळेच मुलं शिकले.त्याचे प्राथमिक शिक्षण रायकर वाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण नागेश्वर विद्यालय थेरगाव येथे झाले, उच्य माध्यमिकचे शिक्षण कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयातुन झाले. त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण न्यू आर्ट कॉलेज, अहमदनगर येथे पूर्ण केले.
त्यानंतर त्याने नगर मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची चार वर्ष तयारी केली , त्यानंतर पुण्यात परीक्षेची तयारी केली. वडील शेतकरी, जिरायती भागात शेती असल्याने शाश्वत उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते, जॉन डिअर मध्ये काम करणारा लहान भाऊ संदीप सकट याने त्याच्या शिक्षणाचा आर्थिक भार उचलला. तसेच वय वाढत चालल्याने दीपकला धाकधूक वाटत होती, आई वडील थकले होते तरी जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न करून त्याने डिसेंबर 2023 मध्ये एमपीएससी परीक्षा दिली, आणि त्याची मंत्रालय लिपिक म्हणून 16 मे 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार निवड झाली. शेतकऱ्याच्या मुलाने कठोर परिश्रम घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची मंत्रालयीन लिपिक पदी वर्णी लागली आहे.
निवड झाल्यानंतर उद्योजक सुरेश गोरखे आणि थेरगाव ग्रामपंचायत यांच्यावतीने दिपकचा सत्कार करण्यात आला, यावेळी उद्योजक सुरेश गोरखे, सरपंच मिनिनाथ शिंदे, उपसरपंच प्रतीक्षा महरणावर,किरण शिंदे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्याला जर जीवनात यशस्वी होयचे असेल तर सर्वात आधी आपण आपल्या उदिष्टाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याचा प्राप्तीसाठी आपले प्रयत्न हे लक्षवेधी बानासारखे निरंतर आणि केंद्रित असायला हवे आहेत, त्याशिवाय यशाची प्राप्ती होणार नाही. असे मला वाटते. कारण आपण आपले ध्येय, उद्दिष्ट एकदा निश्चित केले आणि त्याला प्रयत्नांची जोड दिली की मग वाटेत कितीही अडचणी आल्या तरी यशाचा मार्ग आपोआप मोकळा होत जातो. त्याच बरोबर माझ्या आईवडिलांची साथ, आणि लहान भावाचा आधार तसेच माझ्यावरचा विश्वास आणि त्याच "मला अधिकारी बनवण्याच स्वप्न" या सार्वांची सांगड घालत मी मंत्रालय लिपिक हे पद मिळवले आहे.
- दिपक सकट
तर दिपक झाला असता ट्रॅक्टर ड्रायव्हर
अभ्यास करत असताना हे जमेल की नाही , त्यामुळे अभ्यास बंद करून ट्रॅक्टर घ्यावा असा त्याचा विचार चालला होता, त्यामुळे वडिलांना घरी मदत पण होईल . परंतु दिपकने जिद्द न सोडता आईवडीलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून अभ्यास केला, नाहीतर तर आज तो ट्रॅक्टर घेऊन ड्रायव्हर झाला असता.


