कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत जामखेड मध्ये महायुतीच्या उमेदवारामागे मोठी ताकद उभी करू, महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जी काही यंत्रणा लागेल त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी दिले.

जय पवार यांनी कर्जत तालुक्यात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नुकतीच भेट घेऊन अडचणी व मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी कर्जत भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांच्याशी संवाद साधला.

यावेळी जय पवार म्हणाले की, अजित पवार हे महायुतीचे उमेदवार आहेत हे ठरविणारे रोहित पवार कोण आहेत,त्याचा निर्णय महायुतीचे नेते घेतील, अजित दादांबरोबर स्वतःची तुलना करून स्वतःची उंची वाढविण्याचा प्रकार ज्युनिअर पवार करत आहेत,  जर कोणी पवार या आडनावावर पैश्याच्या जीवावर माज करत असेल, ऊसाच्या कारखान्याच्या माध्यमातून  कोणाला धमकावून वेठीस धरत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम करण्याचा इशारा देखील दिला आहे. 

या भागात महायुतीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे अशी जय पवार  यांनी तालुकाध्यक्ष खरमरे यांच्याकडे आशा व्यक्त केली. महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जे काही करता येईल , त्या गोष्टींची आपण पूर्तता आपण महायुती म्हणून आपण करू अशी ग्वाही जय पवार यांनी दिली.

दरम्यान तालुकाध्यक्ष खरमरे यांनी जय पवार यांना माहिती दिली, मतदारसंघात भाजप असून पक्ष संघटनात्मक दृष्ट्या प्रबळ आहे, भाजप तळागाळात पोहोचलेला आहे, आ राम शिंदे यांचे काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहे, आपल्या घरातील उमेदवार म्हणून आ राम शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.  महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे आश्वासन देत खरमरे यांनी स्थानिक परिस्थितीची माहिती दिली.