कर्जत (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाची सांगता होत असताना राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयात प्रथमच जिल्हास्तरीय कुस्ती, तायक्वांदो, मास रेसलिंग, बेल्ट रेसलिंग या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांचा प्रारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रथम दिनी १४ वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील तीनशे मुले व मुली यांच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, महाविद्यालय विकास समितीचे जेष्ठ सदस्य व कुस्तीपटू  बप्पाजी धांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी  भाऊराव वीर, उपमहाराष्ट्र केसरी पै. विजय मोढळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, खजिनदार प्रा. प्रकाश धांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले
आज दिवसभर चाललेल्या मुलींच्या कुस्त्यांमध्ये नेवासा, श्रीगोंदा तर मुलांच्या कुस्त्यांमध्ये कर्जत, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यातील कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी केली. यातून प्रथम क्रमांकाच्या कुस्तीपटूंची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी होणार आहे.
सतत तीन दिवस चालणारे या स्पर्धेमध्ये १६ वर्षे वयोगट, १७ वर्षे वयोगट, १९ वर्षे वयोगटाखालील मुले व मुलींच्या कुस्त्यांचे सामने होणार आहेत. दादा पाटील महाविद्यालयाचा जिमखाना विभाग हा सुसज्ज असल्यामुळेच सर्व वयोगटातील मॅटवरील कुस्त्यांचे सामने महाविद्यालयात आयोजित केलेले आहेत. हा बहुमान प्रथमच कर्ज तालुक्याला क्रीडा विभागाने महाविद्यालयाच्या रूपाने दिलेला आहे.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी  राजेंद्र फाळके यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत करून त्यांना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सर्व खेळाडूंसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले.
सदर कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. राजेंद्र शिंदे, प्रा तन्वीर शेख हे विशेष परिश्रम घेत आहेत.या स्पर्धेतील पंच म्हणून जिल्हाभरातील विवेक नाईकल, तानाजी नरके, संभाजी निकाळजे, ईश्वर तोरडमल, शंकर खोसे, गणेश शेळके, श्री काटे यांनी कामकाज पाहिले. तांत्रिक सहाय्य म्हणून विजय तोरडमल, बापू होळकर, मल्हारी कांडेकर, प्रमोद गोडसे, विष्णू खोसे हे मदत करीत आहेत.