कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील एमआयडीसी वरून वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे, आ रोहित पवार हे पाटेगाव खंडाळा परिसरात एमआयडीसी करण्याबाबत आग्रही असताना आ राम शिंदे यांनी कोंभळी परिसरात एमआयडीसीला मान्यता आणली आहे, मात्र कोंभळी परिसरातील जागेबाबत आ पवार यांनी काही त्रुटी मांडल्या आहेत. यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी युवासेना तालुका प्रमुख दीपक गांगर्डे यांनी आ पवार यांच्यावर टीका केली आहे.

गांगर्डे यांनी म्हंटले आहे की आ पवार यांनी पोस्ट करून कोंभळी खांडवी एमआयडीसी व खंडाळा येथील एमआयडीसी मधील फरक जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला परंतु असे करताना दोन्हीही परिसर हे कर्जत जामखेड याच विधानसभा मतदारसंघात येतात हे ते कदाचित विसरलेले दिसत आहेत. 

कारण कोंभळी खांडवी एमआयडीसीला लाल शाहीमध्ये म्हणजेच नकारार्थी पद्धतीने मांडले आहे त्यावरून आ पवार यांचा रोख स्पष्ट जाणवत आहे की या परिसरात कुठल्याही परिस्थितीत एमआयडीसी होता कामा नये व मी म्हणेल तिथेच सर्व काही झाले पाहिजे असे जाणवत आहे, आ पवार यांनी पोस्ट मध्ये जाणून-बुजून रेल्वे स्टेशन तसेच एअरपोर्ट यांच्या अंतर न दाखवता या सगळ्या गोष्टी खंडाळा एमआयडीसीच्या नकाशा वर हिरव्या अक्षरात दाखवल्या आहेत, खरंच एअरपोर्ट व रेल्वे स्टेशन हे कोंभळी खांडवी पासून जवळ आहे की खंडाळा एमआयडीसी पासून जवळ आहे याचा थोडासा विचार करून सांगितले तर बर होईल अन्यथा यावरून असे दिसते की आ पवार यांनी मतदारसंघाचे पाच वर्ष प्रतिनिधित्व करूनही त्यांचा अभ्यास खूप कमी आहे असेच यावरून दिसत आहे. 

 हे मत मांडण्याचे कारण म्हणजे मी कोंभळी गावचा माजी सरपंच तसेच माजी युवासेना तालुकाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पदाधिकारी असून आपण राज्यात व देशात महाविकास आघाडीमध्ये काम करत असून तसं पाहिलं तर तुमचा आणि आमचा विचार व उद्दिष्ट एकच ते म्हणजे भाजप व भाजपाचे विचार याला विरोध करणे परंतु या विरोध करण्यामध्ये मतदार संघाच्या विकासामध्ये खीळ आणण्याचे काम आ पवार  करत आहेत. ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये एकाच तालुक्यामध्ये चार चार ठिकाणी एमआयडीसी होऊ शकतात तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकाच तालुक्यामध्ये दोनच ठिकाणी काय, तुमच्यामध्ये कर्जत जामखेड तालुक्यामध्ये चार ठिकाणी एमआयडीसी करण्याची ताकद आहे आणि असे असताना आपण आ राम शिंदे  यांनी आणलेल्या एमआयडीसीला का म्हणून विरोध करत आहात किंवा ते क्षेत्र लाल शाहीने लिहायचे आणि तुम्ही आणलेले एमआयडीसीचे क्षेत्र हिरव्या शाईने लिहायचे हे योग्य नाही. 

मी कोंभळी गावाचे व पंचक्रोशीचे प्रतिनिधित्व यापूर्वी केलेले आहे तसेच सध्याही करत आहे तसेच कोंभळी खांडवी,कौडाणे, मुळेवाडी ,चांदे बुद्रुक व खुर्द तसेच गुरु पिंपरी, रवळगाव थेरगाव ,नागमठाण, कोकणगाव मांदळी, घुमरी, निमगाव गांगर्डा ,बेलगाव तिखी,मिरजगाव व मिरजगाव पंचक्रोशीतील जवळपासचे सर्वच गावे या गावांना सदर एमआयडीसी आल्यास फायदा होऊ शकतो परंतु केवळ सदर एमआयडीसीसाठी आणण्यासाठी विरोधातील आमदार प्रयत्नशील आहे यामुळेच फक्त तो परिसर लाल शाहिने लिहायचा हे योग्य नाही. आता आपण म्हणाल की आम्ही राम शिंदे समर्थक आहोत तर तसे आम्हाला आ राम शिंदे यांचेही काहीही घेणेदेणे आहे ना आपले. कारण आपण दोघांनी या परिसराला कायमच विकासापासून वंचित ठेवण्याचे काम आपण केले आहे कारण आजपर्यंत दोघांनीही कुकडीचे पाणी मीच आणून देऊ शकतो हे इथल्या जनतेला कायम सांगून मतांचा मलिदा खाल्लेला आहे आपणच काय येथून पाठीमागे गेल्या 40 वर्षापासून याच मुद्द्यावर येणाऱ्या प्रतिनिधींनी मतदान घेतले निवडून आले परंतु पुढे काहीही केले नाही आणि यापुढेही आपण काही कराल ही कुठलीही अपेक्षा नाही ना आपणाकडून राम शिंदे साहेबांकडून. परंतु जर आमच्या नशिबाने म्हणा किंवा तुमच्या दोघांचे एकमेकांच्या विरोधाने म्हणा जर आमच्या भागात एमआयडीसी सारखे औद्योगीकरण होणार असेल तर कोणाच्याही पोटात दुखण्याचे काहीही कारण नाही आणि जर याबाबतीत कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याला समोरासमोर विरोध करण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. कारण एक तर मिरजगाव गटाचा अर्धा भाग कायम दुष्काळी परिस्थितीत राहिलेला आहे येथे कोणत्याही परिस्थितीत विकास झालेला नाही आणि असे असताना जर तुमच्या स्पर्धेत आमच्या भागाचा विकास होणार असेल तर त्या विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आमचा विरोध असेल आणि यासाठी माझे मिरजगाव गटातील सर्व घटकातील व पक्षातील लोकांना हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या परिसरातील विकासाला आड येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विरोध केला पाहिजे मग ते रोहित पवार असतील किंवा राम शिंदे या अन्य कोणी... आणि जर कोणी या परिसराचा विकास करणारा असेल तर त्याच्यासोबत ठामपणे उभा राहिले पाहिजे मग ते रोहित पवार असो किंवा राम शिंदे..

यानिमित्ताने दोन्ही आमदारांना या परिसराच्या व पंचक्रोशीच्या वतीने माझे सांगणे आहे की जर आपण या परिसराकडे विकासाच्या दृष्टीने पहाल तर आम्ही तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहू अन्यथा या परिसराची वक्रदृष्टी आपल्यावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू याची आपण नोंद घेतली पाहिजे. 

तसेच सर्वच पक्षीय संघटना मधील तसेच सर्व जाती-धर्माच्या व समाजाच्या लोकांना विनंती आहे की आपण मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा मी या संघटनेचा मी त्या संघटनेचा हा विचार न करता आपल्या परिसराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे व राहिले पाहिजे. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे म्हणून माझे दादा किंवा माझे साहेब फार भारी कसे आहेत हे दाखवण्यापेक्षा आपल्या परिसराचा विकास जो कोणी करेल तोच आमच्यासाठी चांगला ही भूमिका घ्यायला पाहिजे. गेल्या तीन चार पिढ्यापासून आपण आपल्या नेत्यांचे लांगुल चालन करत आलेलो आहोत ते आता बंद केले पाहिजे व जो आमच्या परिसराचा विकास करेल त्यालाच आमचा पाठिंबा राहील ही भूमिका सर्वांनी घेणे गरजेचे आहे अन्यथा येणारा काळ हा आपल्यासाठी चांगला असणार नाही.

 

तसेच आमदार रोहित पवार यांना माझी विनंती आहे की आपण उद्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे उद्या येणारे सरकार हे महाविकास आघाडीचे असेल व असावे ही आमची ही इच्छा आहे परंतु हे सरकार आल्यानंतर आपण ज्याप्रमाणे कोंभळी खांडवी परिसराचा नकाशा लाल शाईने रंगवला आहे त्यामधून तुमचे विचार स्पष्ट जाणवत आहेत की महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आपण इथे लाल फुली मारल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की सदरील पंचक्रोशीचा एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून आपण निवडणुकीच्या अगोदर या मिरजगाव गटातील एमआयडीसीला आहे ती मान्यता तशीच ठेवून जर आपण निवडून आलात आपल्या म्हणण्याप्रमाणे तर आपण निवडून येणारच आहात तर सदरील एमआयडीसी ही रद्द होणार नाही तसेच आपल्या मनातील एमआयडीसी म्हणजेच खंडाळा एमआयडीसी येथे ज्या प्रमाणात उद्योग येणार आहेत त्याच प्रमाणात उद्योग हे कोंभळी खांडवी एमआयडीसीत आणाल असे आश्वासन जाहीर करावे तसेच आपल्या लेटर पॅड वर लेखी जाहीर करावे तरच एक महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून आम्ही आपला विचार करू शकतो अन्यथा आमचा जाहीर विरोध आपणास असेल हेही या निमित्ताने स्पष्ट करतो.

मी सदरिल मत हे कोणावरही टीका करण्यासाठी किंवा कोणाचेही समर्थन करण्यासाठी मांडलेले नसून फक्त मिरजगाव परिसराच्या विकासासाठी मांडलेले आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा दोन्हीही आमदारांच्या समर्थकांनी कुठल्याही प्रकारे मनाला लावून घेण्याची गरज नाही .आम्हाला विकास हवा आहे आणि आम्ही विकासाबरोबरच असू हीच माझी भूमिका असल्याचे दीपक गांगर्डे यांनी म्हंटले आहे.