कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे एका सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणाऱ्या कंपनीने रस्त्याच्या कडेला उभे केलेले धोकादायक विजेचे खांब काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत येथील राहुल विष्णू गांगर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधितांकडे तक्रार केली आहे. गांगर्डे यांनी केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, मे. सुंदरम पेट्रोकेम प्रा.लि. मुंबई या कंपनीमार्फत कोंभळी गाव हददीमध्ये भाडेतत्वाच्या जमिनीवरती ५ मेगा व्हॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प आस्थापीक करण्याचे काम चालु करण्यात आलेले आहे. सदर कंपनीच्या प्रतिनिधींकडून कोंभळी गावात रस्त्यालगत कोणतेही सुरक्षीत अंतर न ठेवता साईडपटटीवर ११ के. व्ही इलेक्ट्रीकल पोल/खांब उभे करण्यात आलेले आहेत. त्यापासून स्थानिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. या कामासाठी आपल्या कार्यालयाकडून सदर कंपनीस परवानगी देण्यात आली आहे का,  खुलासा करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे.

 काम करताना कंपनीने जि.प.प्राथ. शाळेच्या गेटला चिकटून पोल रोवले आहेत. त्यामुळे भविष्यात शाळेतील मुलांना धोका निर्माण होवू शकतो याचाही विचार करावा, तसेच सदर कंपनीला गांगर्डे यांनी काम करताना याबाबत सूचना/विचारणा केली होती. सदर कंपनीचे ठेकेदार हे अतिशय मुजोर व नंगड प्रवृत्तीचे असून त्यांनी काम करतेवेळी माझेवर दहशतीचा व बळाचा वापर करुन तसेच कायदयाचा धाक दाखवून सदरील प्रकल्प रेटून नेला असल्याचे गांगर्डे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे सदर कंपनी विरोधात ग्रामस्थांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण आहे.

तरी कंपनीने बसवलेले सौर उर्जेचे पोल हे आपल्या बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये येत असल्याने आपण अथवा आपल्या कार्यालयातील माहितीगार इसम यांना पाठवून स्थळ पाहणी करुन सदरील मे. सुंदरम पेट्रोकेम प्रा.लि. या कंपनीवर गुन्हा दाखल करुन दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास राहुल गांगर्डे यांनी कार्यालयासमोर आमरण आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.