कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुळेवाडी - कौडाणे रस्त्याचे काम मंजूर झाले आहे, मात्र या रस्त्याला नाव एक , आणि प्रत्यक्षात काम दुसऱ्याच रस्त्याचे होणार असल्याचा आरोप मुळेवाडी ग्रामस्थांनी केला असून मंजूर रस्त्याचे काम नकाशा व ड्रॉईंग प्रमाणे करण्याचा व रस्त्याचा चुकीचा सर्व्हे झाला असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शुक्रवारी ठराव मंजूर करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील प्रजिमा ६६ (मुळेवाडी ते कौडाणे रस्ता किमी ०.०० ते ५.०० (व्हि आर७) (एल आर १७४) हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता मंजूर झालेला आहे. मुळेवाडी ते कौडांग व चांदे बु ते कॉंडाणे ता कर्जत हे दोन्ही रस्त्यांपैकी मुळेवाडी ते काँडाणे (आराखडयातील नाव प्रजिमा ६६ मुळेवाडी ते काँडाणे ते सुद्रिक वस्ती रस्ता) हा ग्रामा ७ दर्जाचा असल्याचा खुलासा कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी केला आहे. या पत्राची चौकशी करण्याबाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
त्या अनुषंगाने मुळेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा बोलवण्यात आली होती, या ग्रामसभेत मंजूर असलेल्या प्रजिमा ६६ (मुळेवाडी ते कौडाणे रस्ता किमी ०.०० ते ५.०० (व्हि आर७) (एल आर १७४) या रस्त्याचे काम मंजूर आहे त्याप्रमाणे करण्यात यावा तसेच सदर रस्ता नकाशाप्रमाणे व ड्रॉईंग प्रमाणे करण्याचा ठराव करण्यात आला.
मुळेवाडी ते कौडाणे रस्त्याचा सर्व्हे चुकीचा असेल तर तो सर्व्हे ज्या अधिकाऱ्यांनी केला असेल त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारा ठराव देखील यावेळी मंजूर करण्यात आला.
चांदे बु ते कौडाने रस्ता होण्यासाठी आमचा विरोध नसून मुळेवाडी ते कौडाने रस्त्याचे नाव वापरून नाव वापरून त्या रस्त्याचे काम करण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका मुळेवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे. यावेळी मुळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


