कर्जत (प्रतिनिधी) : व्यापक हिताचे निर्णय घेणारे लोक ओळखणे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कौशल्य होते असे  प्रतिपादन खा शरद पवार यांनी केले ते रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील विद्यालय टाकळी खंडेश्वरी ता.कर्जत जि. अहमदनगर विद्यालयाचा नामांतर सोहळा व डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा नुकताच विद्यालयाच्या प्रांगणात खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी बोलत होते.

 यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन तयार करताना खा. पवार म्हणाले, कर्तृत्ववान पिढी तयार करण्याचे काम कर्जत भागातील जनतेने स्वीकारल्याने या भागाचा शैक्षणिक विकास झालेला आहे. कर्जत हे शिक्षणाचे केंद्र झाले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पाय या परिसराला लागले, व्यापक हिताचे निर्णय घेणारे लोक ओळखणे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कौशल्य होते. कर्मवीरांचा आदर्श पायवाट स्वीकारून दादा पाटील यांनी काही सहकार्यांना सोबत घेऊन कर्जत व परिसरामध्ये शिक्षणाचे रोपटे रोवले. दादा पाटील व या परिसरातील लोक जे काम करायचे त्याची माहिती आबासाहेब निंबाळकर यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब गांगर्डे यांनी विद्यालयाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या विकासाची माहिती दिली. किरण पाटील यांनी दादा पाटलांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबर केलेल्या कार्याची उजाळा देऊन दादा पाटलांच्या कर्मभूमीतील विद्यालयास मॉडेल स्कूल संस्थेने बनवावे अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी,  व्हा. चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व खा. निलेश लंके, संस्थेचे सचिव  विकास देशमुख, संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव  प्रिं.डॉ. शिवलिंग मेनकुदळे, ऑडिट विभागाचे सहसचिव प्रिं.डॉ. राजेंद्र मोरे, जनरल बॉडी सदस्य राजेंद्र फाळके, बाजीराव कोरडे, दादा पाटलांचे नातू निळकंठ पाटील, किसनराव ढोबे,विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, ज्ञानेश्वर खुरंगे, बाळासाहेब साळुंखे, कैलास शेवाळे आदींसह टाकळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे बाळासाहेब सपकाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ व सेवकांनी परिश्रम घेतले.