कर्जत (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत दोन वेळा अपयशानंतर अराजपत्रित संयुक्त गट मधील सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात कर्जत तालुक्यातील तालुक्यातील खांडवी येथील वैभव नानासाहेब तापकीर या शेतकरी पुत्राने मोठे यश संपादन केले आहे. खांडवी सारख्या छोट्याश्या गावातून एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने प्रयत्न, मेहनत, चिकाटी च्या जोरावर मिळवलेले हे यश वाख्याण्याजोगे असून संपुर्ण तालुक्यातून या शेतकरी पुत्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
नानासाहेब तापकीर व संगिता तापकीर हे तालुक्यातील खांडवी येथील शेतकरी दांपत्य. घरची परिस्थिती जेमतेम, वडील शेतकरी, आई गृहीणी. त्यांना दोन मुलं. त्यापैकी वैभव हा धाकटा. वैभव लहानपणापासून हुशार, जिद्दी, अभ्यासू मुलगा. त्याचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्राथ शाळा खांडवी येथे झाले पाचवी मध्ये केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या नवोदय  परिक्षेत यश संपादन करून पुढील शिक्षणासाठी जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे जावून ६ वी ते १२वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यानंतर उच्च शिक्षणासाठी सिंहगड इंस्टीट्यूट पुणे येथे E&TC अभियांत्रीकी शाखेत प्रवेश घेऊन इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
परंतु अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करत असताना स्पर्धा परिक्षेत यश संपादन करून अधिकारी होण्याचे ध्येय मनी बाळगल्यामुळे campus placement मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असताना आपले व वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परिक्षेचा मार्ग निवडला व तो पूर्णत्वास नेत असताना  वेळोवेळी येणाऱ्या संकटावर मात करत अथक परिश्रम,मित्र परिवाराचे व गुरुजनांचे मार्गदर्शन , कुटुंबीयांचे मानसिक व आर्थिक पाठबळ विशेषतः मोठ्या भावाची व शालेय जीवनातील मित्रांची साथ मिळाली.
 आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना राज्य लेव्हलच्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन करणारे त्याचे वडील हेच त्याच्यासाठी प्रेरणादायी आहेत. आई- वडिलांना या परिक्षांबद्दल जास्त माहिती नव्हती परंतु आपला मुलगा काही तरी करून दाखवणार हा विश्वास त्यांना होता.
एका सर्वसामान्य शेतकरी पुत्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यश प्रधान करू शकतो व एएसओ या पदाला गवसणी घालतो हे ग्रामीण भागातील मुला व मुलींच्या साठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. वैभवने यश प्राप्त केले यामध्ये त्याच्या आई-वडिलांचे कष्ट व त्याची मेहनत या गोष्टी तो प्रामुख्याने सांगतो.
त्यांची निवड झाल्याचे वृत्त समजताच खांडवी येथील मित्र परिवार व कुटुंबियांच्या वतीने फटाके फोडून तसेच पुणे येथील सर्व शालेय, कॉलेज मित्र परिवाराने फटाके व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला त्यानंतर सर्व नातेवाईक, मित्र ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काकासाहेब तापकीर, खांडवी गावचे सरपंच प्रविण तापकीर, शहाजी तापकीर,प्रमोद तापकीर,प्रकाश पठारे,अभिजित तापकीर,वैभव तापकीर,दिपक एकाड,प्रशांत तापकीर,सौरभ सांगळे व खांडवी ग्रामस्थांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

या क्षेत्रात करिअर घडविण्याचा निर्णय आज सार्थकी  लागला याचे समाधान वाटते. चार वर्षाच्या कालावधीत केलेल्या कष्टाचे फळ मिळाले आहे. या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा आणि मित्रांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या सपोर्ट शिवाय हे यश मिळवू शकलो नसतो. या क्षेत्रात संयम ठेवणे खूप महत्वाचे आहे. संयम ठेवून जर अभ्यास केला तर प्रत्येकाला यश हमखास मिळेल असे मला वाटते.

- वैभव नानासाहेब तापकीर