कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत पंचायत समितीचे ग्रामसेवक, कनिष्ठ लेखाधिकारी, ग्रामरोजगार सेवक एसीबीच्या सापळ्यात सापडले असून तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि 23 ) रोजी रंगेहाथ पकडले आहे.या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये कर्जत पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी, वर्ग-3 नामदेव दिगंबर कासले, (रा कर्जत ता कर्जत, जि.अहिल्यानगर मूळ रा. महेबूबनगर, काळेगाव रोड, अहमदपूर, ता.अहमदपूर, जि.लातूर) , तसेच ग्रामसेवक अनिल अंकुश भोईटे, ( सध्या नेमणूक आळसुंदे ता.कर्जत तत्कालीन नेमणूक कोंभळी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर) (रा. तिरुपती नगर, कर्जत, ता. कर्जत, जि.अहिल्यानगर) व रोजगार सेवक दिपक नाना शेलार, (ग्रामपंचायत कोंभळी ता. कर्जत, जि.अहिल्यानगर रा.कोंभळी, ता.कर्जत, जि. अहिल्यानगर) या तिघांना लाचलुचपत च्या पथकाने तीन हजाराची लाच घेताना पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची कोंभळी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर येथे शेत जमीन आहे. तक्रारदार यांना वैयक्तिक विहीर खोदण्याकरता गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत यांचे कडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत सदर विहीर खोदण्यासाठी तक्रारदार यांना पंचायत समिती कर्जत येथून चार लाख रुपये मंजूर झाले होते. सदरची रक्कम तक्रारदार यांना विहिरीचे झालेले कामाचे टप्प्यानुसार मिळणार होती. त्यानुसार विहिरीचे काम सुरू झाल्यानंतर आजपर्यंत सुमारे 2,75,602/- रुपये मिळालेले आहेत. आता तक्रारदार यांचे विहिरीचे काम पूर्ण झाले असून विहिरीचे मंजूर रकमेमधील उर्वरित रक्कम 1,23,924/- रुपये बाकी असून त्याबाबत तक्रारदार यांनी त्यांचे कोंभळी गावातील ग्राम रोजगार सेवक बाळू उर्फ दीपक शेलार यांची दिनांक 21/10/ 2024 रोजी कोंभळी, ता.कर्जत येथे भेट घेतली होती. त्यावेळी ग्राम रोजगार सेवक शेलार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचायत समिती कर्जत येथील कर्मचाऱ्यांसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार दि.21/10/2024 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.22/10/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान ग्रामरोजगार सेवक शेलार यांनी पंचायत समिती कार्यालय कर्जत येथून तक्रारदार यांचे विहिरीचे कामाचे उर्वरित बिल मंजूर करण्याचे कामासाठी पंचायत समिती कर्जत येथील लोकसेवक नामदेव दिगंबर कासले, कनिष्ठ लेखाधिकारी यांच्यासाठी तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी पंचांचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. लोकसेवक नामदेव दिगंबर कासले यांनी पंचा समक्ष सदरची लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवून सदरची लाच रक्कम लोकसेवक शेलार यांच्याकडे देण्याची संमती दिली व लोकसेवक आणि अंकुश भोईटे, ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांना पंचा समक्ष सदरची लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले. दिनांक 23/10/2024 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक दिपक शेलार यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचे कडून 3000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, उमेश मोरे आणि दशरथ लाड यांचा समावेश होता.


