कारगिल युद्ध सुरू झालं, तेव्हा आमचं युनिट सीमेवर पाठवण्यात आलं. त्या काळात आमच्यासोबत स्थानिक नागरिक खूपच सहकार्य करत होते. त्यांच्या मदतीने आम्ही आमचं काम अधिक जोमाने करू शकलो. युद्धाच्या त्या दिवसांमध्ये — पाच रात्र आणि पाच दिवस आम्ही एक क्षणही झोपलो नाही. थंडी, तणाव, आणि शत्रूचा दबाव असूनही मनात एकच भावना होती – भारत माता की जय!
युद्धामध्ये विजय मिळवल्यानंतर जो आनंद मिळाला, तो शब्दांत सांगता येणारा नाही. आपल्या देशासाठी, आपल्या मातेसाठी काहीतरी केल्याचं समाधान आयुष्यभर पुरून उरेल असा अनुभव होता. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद होता.
आज मी माजी सैनिक आहे, पण मनोमन अजूनही देशसेवेच्या भावना ताज्या आहेत. काश्मीरमध्ये पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर आज आपल्या देशाच्या सीमेवर जम्मू-काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, आपल्या देशावर कोणतेही प्रकारचे परकीय आक्रमण झाल्यास त्यासाठी सडेतोड उत्तर देण्यासाठी आपले सैन्य सक्षम आहे त्यामुळे देशवासीयांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचे काही कारण नसावे अगदी निश्चिंत रहावे,सध्याच्या परिस्थितीमध्ये पुनश्च सैन्य सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी भारत मातेची सेवा करण्यासाठी मी तत्पर आहे तसेच मी नव्या पिढीला एकच सांगू इच्छितो — देशासाठी अभिमान बाळगा, आणि शक्य असल्यास भारतीय लष्करात सहभागी व्हा. देशसेवा ही सर्वोच्च सेवा आहे.
जय हिंद!
---