रयतेचे ज्ञानभगीरथ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती विद्यालयात उत्साहाने साजरी करताना प्रथमतः विद्यालयाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे शिक्षण प्रेमी नागरिक धनराज गांगर्डे, शिवाजी बापू गांगर्डे, मारुती गांगर्डे,रूपचंद गांगर्डे, अमोल गांगर्डे, सचिन दरेकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
विद्यालयास दरवर्षी ट्रॅक्टर सेवा देणारे विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव बाळासाहेब गांगर्डे यांच्या ट्रॅक्टरवर कैलास ढोबे, गंगाराम उंबरे, निखिल काशीद, गणेश खंडागळे,अनिस शेख व राजेंद्र खिलारे यांनी आकर्षक कर्मवीर रथ साकारला होता.
या प्रभात फेरीचे आकर्षण ठरलेल्या वेगवेगळ्या स्टेप्सच्या माध्यमातून गुरुकुल विभाग सचिव चांगदेव जायभाय व संजय राठोड यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थिनींच्या लेझीम नृत्याने सर्वांची मने जिंकली.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कांबळे आणि भाग्यश्री गाडे यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सादर केलेले टिपरी नृत्य आणि देशभक्तीपर गीतावरील नृत्य कोंभळीकर ग्रामस्थांना अतिशय भावले.
विद्यालयातील क्रियाशील शिक्षक योगेश डमाळे व उमेश आखाडे यांनी साकारलेल्या आकर्षक घोषणा फलकाने आणि जोरदार आवाजात दिलेल्या घोषणांनी कोंभळी परिसर दुमदुमला.
मरी माता कलापथक अळसुंदे आणि विद्यालयाचे कलापथक यांनी सादर केलेल्या हलगी, संबळ, ढोल, ताशा यांच्या उत्साह पूर्ण वादनाने प्रभात फेरीत नवीन रंगत आणली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार जयंतीच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यालय करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, सखी सावित्री मंच, सरपंच, उपसरपंच व कोंभळी ग्रामपंचायत सदस्य , सर्व पालक, कोंभळी, खांडवी, कौडाने, रवळगाव, रोटेवाडी, गावडेवाडी येथील शिक्षण प्रेमी नागरिकांनी विद्यालय प्रशासनाचे अभिनंदन केले.