कर्जत (प्रतिनिधी) : येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८वी जयंती तसेच दलितमित्र दादा पाटील यांची पुण्यतिथी दिनी या संयुक्त सोहळ्यात त्यांच्या विचारांचा जागर करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर, प्रमुख वक्ते राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक पीयूष अविनाश गांगर्डे उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेला 'कमवा व शिका' मंत्र, त्यांच्या कार्यांमुळे बहुजन समाजातील तळागाळातील लोकांना मिळालेले शिक्षण, तसेच निर्धारपुर्वक व नि: स्वार्थपणे केलेले कार्य हे विविध प्रसंग गोष्टी रुपात मुलांना व्याख्याते पीयूष गांगर्डे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांना आदर्श मानणारे कर्मवीर अण्णा, कर्मवीरांची शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन इ. बरोबर झालेली भेट व चर्चा अशा नानाविध प्रकारचे किस्से सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली.१९४८च्या दरम्यान अहमदनगर शहर सोडले तर जिल्ह्याच्या इतर भागांत अवघ्या बोटांवर मोजता येतील इतक्याच माध्यमिक शाळा होत्या.परंतु पुढच्या बारा वर्षांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील व दादा पाटील यांच्या अविरत प्रयत्नांमुळे ही संख्या पन्नासपर्यंत जाऊन पोहोचली, अशा शब्दांत दादा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय नगरकर यांनी रयत शिक्षण संस्थेची वाटचाल, कर्मवीर भाऊराव पाटील व दादा पाटील यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. या कार्यक्रमास सरपंच मंगलताई भालेराव, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील, सदस्य निळकंठ पाटील, बाळासाहेब सपकाळ, किसनराव ढोबे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य दादासाहेब गांगर्डे, शिक्षक शेळके गणेश, प्रविण जाधव व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.